मी आनंद माडगूळकर . ख्रंरंतर आम्ही कुलकर्णीच ! पण माणदेशातल्या माडगुळ्याचे कुलकर्णी म्हणून आम्ही माडगूळकर !
" असो कवीचे कुल अप्रसिद्ध , होई कवीच्या कवने प्रसिद्ध ! या उक्तीप्रमाणे या आडनावाला केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर अवघ्या भारतवर्षात ज्यांनी अजरामर अशी किर्ती प्राप्त करून दिली , त्या गीतरामायणकार गदिमा तथा गजानन दिगंबर माडगूळकरांचा मी द्वितीय पुत्र !
१ ऑगस्ट ११९४८ हा माझा जन्मदिवस ! " माझा माध्यान्हीचा सूर्य तुझा श्रीमंत श्रावण ! असं गदिमांनी ज्यांना गौरविलं त्या विद्याताई ही माझी जन्मदात्री .. माझी जन्मदा ! कलापूर म्हणून ज्या शहराला सारं कलाजगत नावाजतं त्या कोल्हापुरात माझा जन्म झाला. माझ्या जन्मानंतर गदिमांनी विद्याताईंना लिहिलं " प्रिये ! हा मुलगा आपल्या जीवनात आनंद घेउन येइल म्हणून याचं नाव आनंद ठेवा . गदिमांच्या सांगण्याप्रमाणे माझं नाव आनंद ठेवण्यात आलं ! पण माझं पालण्यातलं आणखीही एक नाव आहे , ज्ञानेश्वर !
पुण्यातल्या संभाजी पार्कासमोरच्या बोळात " शिशु ज्ञान दीप नसवाची माँटेसरी स्कूल होती . तिथं माझं प्राथमिक शिक्षण झालं आणि मग जंगली महाराज रोडवरच्या मॉडर्न हायस्कूल मधे संपूर्ण शालेय शिक्षण ! महाविद्यालयीन शिक्षणासाठी मी
प्रथम पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला पण त्या कॉलेजला मी फारसा पसंत पडलो नसावा . मग मी कर्वे
रोडवरच्या त्या कालच्या एम . ई. एस . कॉलेजमधून सायन्सचा पदवीधर झालो . मुंबईला व्ही. जे. टी. आय मधे वूलन कपड्याशी संबंधित एक डिप्लोमा करायला गेलो . ( का कुणास ठाउक ! ) तिथे काही माझी डाळ शिजली नाही . म्हणून मग मी हात हालवत पुण्याल परत आलो . या मुक्कामाचा फायदा एव्हढाच कि विजया मेहेता यांच्या रंगायन संस्थेत काही काळ मला त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला .
पुण्याला माझ्या थोरल्या भावाने श्रीधरने तरूणांचे तरूणांसाठी असलेले " जिप्सी " नावाचे मासिक सुरू केले होते त्या जथ्यात सामिल झालो .त्यासाठी बरंच लिहिलं , सिनेमा नटांच्या मुलाखती वगैरे घेतल्या . त्यातूनच म्यूज आर्ट प्रोसेस नावाचा व्यवसाय उभा राहिला पण चालला मात्र नाही . तो व्याप उभारण्यात आणि नंतर आवरण्यात मोलाची दहा वर्षं अक्षरशः वाया गेली . तोपर्यंत मी संगीत गजानन वाटव्यांकडे शिकत होतो . काही काळ तर चक्क सी. रामचंद्र या विख्यात संगीतकारानं मला संगीताचे धडे दिले . त्या काळातच अधेमधे मुंबईत असताना अभिनयाचे राज्य शासनाचं बक्षिस मिळवलं
एका देवकीनंदन गोपाला नावाच्या सिनेमातही काम केलं. १९७७ साली गदिमा निवर्तले आणि मग गीतरामायण माझ्या अंगावर जणू चारी बाजूंनी चालून आलं . मी झपाटला गेलो . अजूनही ते झपाटलेपण कायमच आहे . भारतात जवळजवळ
सगळ्या प्रांतात आणि मॉरिशस , ऑस्ट्रेलिया, अमेरिका. गल्फ अशा परदेशात गीतरामायणाचे निदान सातशे कार्यक्रम गेल्या पंचवीस तीस वर्षात केले असतील . गीतरामायणाबरोबरच गदिमायन, नामघेता हे ही कार्यक्रम करतो.
व्यवसाय म्हणून माझ्या श्री फिल्मस या संस्थेच्या वतीने शासनाच्या विविध विभागां करीता मी जवळजवळ चाळीस अनुबोधपटांची निर्मिती केली . अजूनही करतोच आहे .
गदिमा , बाबूजी तथा सुधीर फडके आणि सदगुरू श्री ब्रन्मचैतन्य महाराज गोंदावलेकर ही त्रिमूर्ती माझं दैवत आहे .अखेरच्या श्वासापर्यंत गीतरामायण गाता यावं हा माझा ध्यास आहे . धन्यवाद ! |