Anand Madgulkar Logo
 
पुढील काही महिन्यात
  न्यूयॉर्क मध्ये गदिमायन कार्यक्रमाला मिळालेल्या भरपूर प्रतिसादानंतर, आता आनंद माडगूळकर तोच कार्यक्रम ८ नोव्हेंबर ला व्हँकूव्हर ( कॅनडा ) मध्ये, १५ नोव्हेंबरला टोरॅटो ( कॅनडा ) येथे आणि १६ नोव्हेंबरला बफेलो (अमेरिका) येथे सादर करणार आहेत.
आनंद माडगूळकरांचा अमेरिकेतील संपर्क क्रमांक आहे. द्वारा भास्कर मराठे ,
निवास : ३३०-६६५-२३४२
भ्रमणध्वनी: ३३०-२३४-०९२७.
  अधिक माहिती >>
गीतरामायणाचे रामायण
  गीतरामायण हे अजरामर काव्य म्हणजे गदिमा आणि बाबूजी तथा सुधीर फडके यांच्या कारकिर्दीचा जणू अत्युच्च बिंदू ! ते दोघेही , गीतरामायण आपण केले नाही तर आपल्याकडून ते करविले गेले असे अत्यंत श्रद्धेने म्हणत असत .
  पुढे वाचा >>
 

मी

आणि मनात आले
  ७०-७२ साल असेल. आम्ही, नुकतेच महाविद्यालयातून बाहेर पडलेल्या तरूण पोरांनी जिप्सी नावाचे एक मासिक सुरू केले होते . मी त्यावेळी मुंबईत होतो . व्ही. जे. टी आय नावाच्या एका प्रख्यात संस्थेत "लोकर " या विषयावरचा एक डिप्लोमा कोर्स करत होतो . हा कोर्स मी का करत होतो हा मला अजूनपर्यंत न सुटलेला एक प्रश्न आहे , कारण त्यानंतर हिवाळ्यात लोकरीचा स्वेटर घालणे या व्यतिरिक्त त्या विषयाशी माझा पुन्हा संबंध आला नाही . असो ! तर त्यावेळी जिप्सीसाठी जाहिराती मिळविण्याचे कांम मी फावल्या वेळात करीत असे . दादर विभागात असणार्‍या टायकलवाडीत युनायटेड हाउस नावाच्या एका खूप जुन्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर गदिमांना मायबाप सरकारनं दिलेला फ्लॅट होता . ( गदिमा त्यावेळी विधानपरिषदेचे आमदार होते . आमच्या बॉम्बे ब्लॉकला "मठी" अशी एक संज्ञा होती . कारण चित्रपटाच्या कामासाठी मुंबईत येणे आवश्यक असणार्‍या पण मुंबईत राहण्याचा ठावठिकाणा नसणार्‍या पुण्याच्या मंडळींचं "अण्णांची मुंबईतील मठी" हे एक हक्काचं ठिकाण होतं . कधीही जा गदिमांची स्वतःची निजण्याची खाट सोडून इतरत्र पाचसात लुंगीवाली थकलीभागलेली पुणेकर मंडळी इतस्ततः पसरलेली असत . यातच कधीकधी संकलक दादा खोचीकरही असत. दादा माझी जाहिरातीसाठी चाललेली धडपड पहात होते .एक दिवस मला म्हणाले , " यार बाबा ! ( हे माझं घरगुती नाव !) आज तुम्हारा काम करवा देते है ! माझं आणि दादांचं हिंदी संभाषण हाही पपांच्या मनोरंजनाचा एक विषय होता . यावर अर्थातच मी उत्साहानं उंच उडी मारली आणि त्यांच्याबरोबर त्यांनी सांगितलेल्या वेळेला अचूक तयार झालो . ग्रँट रोडच्या नाझ बिल्डिगमध्ये मुंबईतील चित्रपट वितरकांची बरीचशी ऑफिसेस आहेत . त्यातल्या एका जुनाट कोंदट ऑफिसमधे दादा घेउन गेले . फिल्मच्या जुन्या गंजलेल्या डब्यांनी ते छोटसं ऑफिस गच्च भरलं होतं . तिथं एका चाळिसीतल्या पंजाबी माणसाशी दादांनी माझी ओळख करून दिली . मग आमची सविस्तर बोलणी झाली . बरीच घासाघीस केल्यानंतर भाव फायनल झाला. त्यानं मला फुल पेजचे चारपाच मोठेठे ब्लॉकस दिले . गेला बाजार हजार रूपयाला तरी मरण नव्हतं .

तेव्हढ्यात एक म्हातारा टायपिस्ट वाकत आत आला. त्याण ट्रिप्लिकेटमधे ऑर्डर टाईप करून माझ्या हातात दिली . मी अगदी खूष होउन गेलो . घरी परत गेल्यावर दादांना शतशः धन्यवाद दिले . यथाकाल जिप्सीचा दिवाळी अंक प्रसिद्ध झाला . मोठ्यामोठ्या जाहिराती मिळविल्याबद्दल मी पुण्यात भरपूर भाव खाल्ला .

पाचसहा महिन्यानंतर मी वसूलीसाठी त्या गृहस्थाच्या ऑफिसवर जाउन पोहोचलो . यावेळी दादा बरोबर नव्हते . पण तशी गरजही नव्हती कारण त्या गृहस्थाची आणि माझी आता बर्‍यापैकी ओळख झाली होती . मी मोठ्या उत्साहाने आत गेलो . पण आत कुणी वेगळीच स्वारी बसलेली होती . हा गृहस्थाचा चेहेरामोहरा आधीच्या माणसासारखाच पण थोडासा प्रौढ होता . त्यावरून मी केलेला तर्क खरा निघाला कारण तो मी भेटलेल्या प्रोड्युसरचा मोठा भाउ होता . मी त्याला सर्व हकिकत विस्तारानं सांगून बिलाची मागणी केली . तो प्राणी थोडावेळ माझ्याकडे नुसता बघतच राहिला ! आणि मग सावकाशपणे म्हणाला,

" माझ्या भावाकडे पाहून तुम्हाला काही संशय आला नाही का?

म्हणजे?
अहो , तो माझा भाउ ठार वेडा आहे . काही वर्षापूर्वी त्याचा एक चित्रपट पडला आणि त्यातून त्याच्या डोक्यावर परिणाम झाला. असेच कुणाकुणाशी करार करतो. कुणाशी लेखक म्हणून .. कुणाशी पटकथेसाठी ! निस्तरावं लागतं मला !

आणि मग त्याच्याकडे आलेला टायपिस्ट ?
तो ही त्याच्यासारखाच वेडा आहे !

मी हे सारं ऐकून अक्षरशः सुन्न झालो . घरी आलो तरी माझ्या डोक्यातून त्या अफलातून व्यक्तीबद्दलचा विचार काही केल्या जात नव्हता , पण रात्री झोपताना नव्यानं मनात आलं त्या भावाकडे आपण एकदा नीट निरखून पहायला हवं होतं !
 
 
 
 
Anand Madgulkar Logo