Anand Madgulkar Logo
 
पुढील काही महिन्यात
  न्यूयॉर्क मध्ये गदिमायन कार्यक्रमाला मिळालेल्या भरपूर प्रतिसादानंतर, आता आनंद माडगूळकर तोच कार्यक्रम ८ नोव्हेंबर ला व्हँकूव्हर ( कॅनडा ) मध्ये, १५ नोव्हेंबरला टोरॅटो ( कॅनडा ) येथे आणि १६ नोव्हेंबरला बफेलो (अमेरिका) येथे सादर करणार आहेत.
आनंद माडगूळकरांचा अमेरिकेतील संपर्क क्रमांक आहे. द्वारा भास्कर मराठे ,
निवास : ३३०-६६५-२३४२
भ्रमणध्वनी: ३३०-२३४-०९२७.
  अधिक माहिती >>
गीतरामायणाचे रामायण
  गीतरामायण हे अजरामर काव्य म्हणजे गदिमा आणि बाबूजी तथा सुधीर फडके यांच्या कारकिर्दीचा जणू अत्युच्च बिंदू ! ते दोघेही , गीतरामायण आपण केले नाही तर आपल्याकडून ते करविले गेले असे अत्यंत श्रद्धेने म्हणत असत .
  पुढे वाचा >>
 
माझे सूर

" अरे ! एव्हढी ताकद लावली तर मरेल रे हा !

 

मराठी रंगभूमीला लाभलेला एक अनमोल हिरा म्हणजे स्व. काशीनाथ घाणेकर ! अत्यंत देखणं व्यक्तीमत्व आणि तितकाच समर्थ अभिनय ! सहज आठवायचं म्हटलं तर घाणेकरांची कितीतरी सुपहिट नाटकं आपल्याला आठवतात . आज मला तुम्हाला, माझ्या मनात जणू घर करून बसलेली एक आठवण सांगायचीय .

असाच काशिनाथ घाणेकर नायक असलेल्या एका नाटकाचा प्रयोग . स्थळ बालगंधर्व रंगमंदिर . नाटकात काशिनाथ असल्यामुळे ते हाउसफुल्ल होतं हे वेगळं सांगायला नकोच ! तसं नाटक फारसं गाजलेलं नव्हतं . सुरूंग किंवा असंच काहितरी त्या नाटकाचं नाव असावं . पण त्यातल्या नायकाच्या भूमिकेत घाणेकर हळूहळू रंग भरत होते . पण नंतर त्यांचा अभिनय विलक्षण आक्रमक होत गेला. प्रेक्षक एव्हाना त्यांच्या केंव्हाच ताब्यात गेले होते . काशिनाथ त्यांच्या थोड्याश्या आक्रस्ताळ्या आविर्भावाने प्रेक्षकांच्या भावनांशी लीलया खेळत होते .त्या दिवशी पहिल्या रागेत बसून हा प्रयोग पहात होतो . माझ्याच रांगेत काही खुर्च्या सोडून विख्यात संगीतदिग्दर्शक सी . रामचंद्र बसलेले होते .

संपूर्ण नाटकाचं वळण बदलणारी एक भलंमोठं स्वगत घाणेकर बोलू लागले . त्यांच्या गळ्याच्या शिरा ताणल्या गेल्या . डोळ्यात कधी अंगार फुलायचा तर कधी मूर्तीमंत कारूण्य प्रगटायचं सर्व ताकद एकवटून ते आवाज फेकत होते . जणू त्यांची सर्व प्राणशक्ती त्यांच्या चेहेर्‍यावर एकवटली होती. माझ्या झरकन मनात आलं देव न करो पण हे इतकी ताकद लावताहेत कि न जाणो त्यातच त्यांच्या जिवाला काही बरंवाईट व्हायचं . माझ्या मनात हा विचार उमटतोय एव्हढ्यात पहिल्या रांगेत बसलेले सी. रामचंद्र गहिवरलेल्या आवाजात ओरडले " अरे ! एव्हढी ताकद लावली तर मरेल रे हा ! क्षणभर सारं सभागृह अवाक झालं पहिल्या रांगेत बसलेल्या मला तर काशिनाथजींच्या गहिर्‍या डोळ्यात अश्रू चमकल्याचा भास झाला . सुदैवाने काही अपप्रसंग न घडता नाटक संपलं .रात्री माझ्या मनात मात्र एका मनस्वी कलावंतानं दुसर्‍या मनस्वी कलावंताला दिलेली ती  जगावेगळी दाद घुमत होती .

   
  Print Printable Version
 
 
 
Anand Madgulkar Logo