Anand Madgulkar Logo
 
पुढील काही महिन्यात
  न्यूयॉर्क मध्ये गदिमायन कार्यक्रमाला मिळालेल्या भरपूर प्रतिसादानंतर, आता आनंद माडगूळकर तोच कार्यक्रम ८ नोव्हेंबर ला व्हँकूव्हर ( कॅनडा ) मध्ये, १५ नोव्हेंबरला टोरॅटो ( कॅनडा ) येथे आणि १६ नोव्हेंबरला बफेलो (अमेरिका) येथे सादर करणार आहेत.
आनंद माडगूळकरांचा अमेरिकेतील संपर्क क्रमांक आहे. द्वारा भास्कर मराठे ,
निवास : ३३०-६६५-२३४२
भ्रमणध्वनी: ३३०-२३४-०९२७.
  अधिक माहिती >>
गीतरामायणाचे रामायण
  गीतरामायण हे अजरामर काव्य म्हणजे गदिमा आणि बाबूजी तथा सुधीर फडके यांच्या कारकिर्दीचा जणू अत्युच्च बिंदू ! ते दोघेही , गीतरामायण आपण केले नाही तर आपल्याकडून ते करविले गेले असे अत्यंत श्रद्धेने म्हणत असत .
  पुढे वाचा >>
 
कृष्णगाथा
प्रथम आवृत्ती...
 

गजरः राधेकृष्ण गोपालकृष्ण

माहाराष्ट्रातल्या घराघरात ज्या कवीचं लिखाण नित्यपाठाच्या स्वरूपात वाचलं जातं ते श्रीधर कवी माणदेशातल्या सांगोल्याजवळच्या नाझरे नावाच्या गावचे ! वयाच्या विसाव्या वर्षी श्रीधर कवी पंढरपुरास आले .काव्यरचनेची परंपरा त्यांच्या घराण्यात पूर्वीपासूनच होती . अप्रतीम निवेदनशैली आणि रसाळ शब्दकळेची त्यांना जणू दैवी देणगीच होती .

शिवलीलामृत, पांडवप्रताप , वेदान्तसूर्य यासारखे त्यांचे ग्रंथ आजही घरोघर वाचले जातातच पण त्यांच्या लेखणीतून प्रथम उतरलेला श्रीहरिविजय हा ग्रंथ रसनेनं रसज्ञतेनं गाइलेली गोपालकृष्णलीला आहे .

गदिमाचं माडगूळ हे मूळ गाव श्रीधरकवींच्या नाझर्यापासून अवघ्या दहापंधरा मैलाच्या अंतरावर ! गदिमांना बालवयापासून श्रीधरकवींच्या काव्याचे जणू बाळकडू मिळाले होते .माझे खेडे या कवितेत गदिमा म्हणतात,

                                           श्रीधर कविचे नजिक नाझरे , नदी माणगंगा

                                            खेडे माझे नित्य नांदते , धरून संतसंगा !

श्रीधर कवींबद्दल असणार्या या अतीव जिव्हाळ्यामुळेच , गीतरामायणानंतर ,त्याच धर्तीचे काव्य गोपालकृष्णाच्या जीवनावर रचण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर आला तेंव्हा त्यांनी आधार शोधला तो श्रीधकवींच्या श्रीहरिविजयात ! श्रीधरकवींचा हा अलौकिक ग्रंथ आणि गदिमांचं गीतगोपाल , कधी एकमेकांना समांतर वहात जातं तर कधी डौलानं स्वतंत्रपणे प्रवास करतं

कधी त्याच्यात जिवलग मैत्रीणींसारखी झिम्माफुगडी रंगते तर कधी अवखळ लपाछपीही रंगते . या दोन्ही समर्थ काव्यांचा हा मनोरम प्रवास आपल्यासारख्या रसज्ञ श्रोत्यांच्या साक्षीनं रंगवावा हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश्य !     

गजर :

गदिमा नेहेमी गमतीनं म्हणत कि माणसाला जशी कुंडली असते तशी काव्याला पण असते . आता हेच बघा ना! गीत रामायण एकाच संगीतकारानं म्हणजे सुधीर फडक्यांनी स्व्बरबद्ध केलं आणि त्याचं प्रसारणही सलग म्हणजे एकाच वर्षी

आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून झालं . पण गीतगोपालची प्रारंभीची काही गीतं मासिक शब्दरंजनामध्ये प्रसिद्ध झाली त्यानंतर

काही अक्षर मासिकात आणि उर्वरित पुण्याच्या दैनिक केसरीतून प्रसिद्ध झाली . क्रमशः प्रसिद्ध होत गेल्याने अनेक प्रसिद्ध आणि अप्रसिद्ध संगीतकारांना सुद्धा गीतगोपाल स्वरबद्ध करण्याचा मोह झाला यात नवल ते कोणतं? नावंच सांगायची तर गजाननराव वाटवे, दत्ता डावजेकर, यशवंत देव आणि सी . रामचंद्र यासारख्या प्रतिथयश संगीतकारांबरोबरच, नाशिकचे बाळ भाटे, अनंत केळकर, डोंबिवलीचे शशिकांत जोशी यासारख्या तुलनेने कमी प्रसिद्ध असणार्या संगीतकारांनीही गीतगोपाल स्वरबद्ध केले . 

या सर्वांच्या निवडक स्वररचना या कार्यक्रमाच्या निमित्ताने रसिकांपर्यंत पोहोचाव्यात असा आमचा मानस आहे .गीतगोपालचा मोठ्या प्रमाणावर सादर झालेला पहिला कार्यक्रम सी.रामचंद्र यानी मुंबईच्या षणमुखानंद सभागृहात सावरकर स्मारकाकरता सादर केला आणि त्यात महेंद्र कपूर, मन्ना डे, लक्ष्मी शंकर, बकुळ पंडित,प्रमिला दातार राणिइ वर्मा यासारख्या त्याकाळच्या अत्यंत लोकप्रिय कलाकारांचा सहभाग होता .     

ज्या प्रसंगापासून गीतगोपालचा प्रारंभ होतो त्या प्रसंगाचा उगमही आपल्याला हरिविजयातून न्याहाळता येतो . धनुर्यागाचं निमित्त करून कंस बलरामकृष्णाला मथुरेला बोलावून घेतो तो हा प्रसंग !

बलरामकृष्ण अक्रूराच्या रथावर चढले आणि रथ मथुरेच्या वाटेनं चालू लागला . त्याच्याबरोबर असंख्य गवळीही कंसासाठी

नजराणा म्हनून दह्यादुधाचे हंडे घेउन निघाले . कृष्ण खरेच गोकुळ सोडून निघाला हे पाहताच गोपिका विलक्षण शोकाकुल झाल्या . रथासमोर गडाबडा लोळू लागल्या . अक्रूराला विचारू लागल्या .....

                  अहा अक्रूरा चांडाळा परियेसी, अकस्मात कोठुनि आलासी , अहा गोकुळिचा प्राण नेतोसी , निर्दय होसी साच तू !

अरे ! आमचा प्राण तू घेउन चाललायस ! जाताजाता आग लाव या गोकुळाला . तू निघालायस खरा , पण कृष्णावाचून आम्ही सगळ्या मरून जाउ आणि त्याचं पाप तुझ्या माथ्यावर बसेल हे विसरू नकोस . अरे तुझं नाव तर अक्रूर आहे , मग तू इतका निर्दय कसा ?

रथासमोर पदर पसरून माती खात त्या म्हणू लागल्या , कृष्णावाचून आम्ही अनाथ आहोत रे , भिकारी आहोत . आम्हाला तेव्हढी कृष्णाची भीक घाल . एव्हढी दया कर आमच्यावर ! अरे त्रिखडात दानी म्हणून नाव होइल तुझं ! यशोदेला तर दु:खावेगाने भोवळ आली . ती म्हणते आहे,

                 माझे सांवळे कान्हाई, उभी गे राजसे कृष्णाबाई , तुजवेगळ्या दिशा दाही, ओस मज वाटती !

गोकुळवासीजनांचा असा आकांत चालला होता .खरोखर श्रीराम वनवासाला निघाले यासारखा हृदय पिळवटून टाकणारा प्रंसंग हा !  आणि मग पद्मपुराणाचा दाखला देत श्रीधरकवी म्हणतात

                 ऐका पद्मपुराणीचे संमत, राधा तेथे आली धावत, रथापुढे येउन त्वरित , ध्यान हरीचे विलोकिले !

राधा त्या जगज्जीवनाच्या सावल्या रूपाकडे टक लावून पहात राहिली . त्या मेघवर्णाच्या रूपड्याने तिचं अंतःकरण ओतप्रोत भरून गेलं तिनं कृष्णचरणी मस्तक ठेवलं आणि मग एक नवल घडलं . राधा हरिस्वरूपात जणू विरघळून गेली . राधा हरिरूप झाली .

कृष्ण मथुरेला गेला तरी ही हरीरूप झालेली राधा गोकुळातच राहिली . वरवर सारे व्यवहार सुरू होते पण अंतर्यामी मात्र

हरीरूपच नांदत होते . अशी ही राधा एखाद्या जखमी पाखरासारखी गोकुळात भिरभिरत राही . जिथं तिचा कृष्णसखा वावरला

त्या गोकुळाचा कणन्कण तिच्यासाठी पुन्हा एकदा जिवंत होई . रात्रीच्या नीरव शांततेत एखाद्या कदंब वृक्षाच्या तळवटी बसून ती तिथल्या वृक्षांना .. वेलींना कमलांना आणि खरं तर स्वतःच्या आत्म्याला कृष्णगाथा पुन्हापुन्हा सांगत असे ......

                                 शरच्चंद्रिका मूक हुंकार देते , वनि राधिका गीत गोपाल गाते !

   
  Print Printable Version
 
 
 
Anand Madgulkar Logo