Anand Madgulkar Logo
 
पुढील काही महिन्यात
  न्यूयॉर्क मध्ये गदिमायन कार्यक्रमाला मिळालेल्या भरपूर प्रतिसादानंतर, आता आनंद माडगूळकर तोच कार्यक्रम ८ नोव्हेंबर ला व्हँकूव्हर ( कॅनडा ) मध्ये, १५ नोव्हेंबरला टोरॅटो ( कॅनडा ) येथे आणि १६ नोव्हेंबरला बफेलो (अमेरिका) येथे सादर करणार आहेत.
आनंद माडगूळकरांचा अमेरिकेतील संपर्क क्रमांक आहे. द्वारा भास्कर मराठे ,
निवास : ३३०-६६५-२३४२
भ्रमणध्वनी: ३३०-२३४-०९२७.
  अधिक माहिती >>
गीतरामायणाचे रामायण
  गीतरामायण हे अजरामर काव्य म्हणजे गदिमा आणि बाबूजी तथा सुधीर फडके यांच्या कारकिर्दीचा जणू अत्युच्च बिंदू ! ते दोघेही , गीतरामायण आपण केले नाही तर आपल्याकडून ते करविले गेले असे अत्यंत श्रद्धेने म्हणत असत .
  पुढे वाचा >>
 
गीतरामायणाचे रामायण

भाग १...

 

मी रामायण ! भारतीयांच्या मनबुद्धीवर हजारो वर्षे अधिराज्य करणारं रामायण ! माझी जन्मकथा आपणा सर्वांना ज्ञात असेलच !  तमसा नदीच्या तीरावर स्नानासाठी गेलेले महर्षी वाल्मिकी तीरावरच्या एका झाडाच्या फांदीवर बसलेल्या एका क्रौंच पक्ष्याच्या जोडीचा विहार मोठ्या आनंदाने न्याहाळत होते . एव्हढ्यात कुणा क्रूर पारध्याच्या बाण वर्मी लागून त्यातली पक्षीण खाली पडली . तिचा जोडीदार तिच्याभोवती आक्रोशत फिरू लागला . हा विलक्षण प्रसंग पाहून त्या महर्षींच्या उरात कोंडलेला संताप त्यांच्या ओठांवर उमटला तो या विश्वातलं पहिलं आदिकाव्य बनून !

ही केवळ एक घटना नव्हती. तो नियतीचा जणू आदेश होता . आणि मग यथावकाश देवर्षी नारदांनी वल्मिकींना रामायणाचं संक्षिप्त कथानक सांगितल आणि ते काव्यात लिहावं असं सुचवलं . निर्णय झाल्यावर आदिकवी तेव्हढ्यावरच थांबले नाहीत . योगमायेनं तळहातावरचा आवळा निरखावा इतक्या तपशीलवार त्यांनी श्रीरामांचं चरित्र न्याहाळलं , मनात ठसवल आणि मग चोवीस हजार श्लोकांनी समृद्ध असं वाल्मिकी रामायण उभं राहिलं . वर्षामागून वर्षे .. शतकामागुन शतके .. सहस्त्रकांमागुन सहस्त्रके जात राहिली . या अजरामर आदिकाव्याचे विविध भाषांतून विविध प्रदेशात विविध अवतार होत राहिले . मुकुंदराजांची ज्ञानदेवांची आणि तुकोबांची मराठीही याला अपवाद नव्हती . संत एकनाथांपासून ते समर्थांपर्यंत अनेक महानुभावांनी ही रामकथा आळवली .. जोपासली ...वाढवली . विसाव्या शतकात हीच रामकथा एक अनोखं .. आगळं रूप घेउन रसिकासमोर अवतरली ....... अवघ्या छप्पन्न गीतात अवघी रामकथा मांडणार्‍या या गीतसंगीतमय चमत्काराचं नाव होतं " गीतरामायण !

असं म्हणतात कि माणसाच्या आयुष्यात एखादी शुभ घटना घडून येणार असली तर तिची प्रसादचिन्हं आधी जाणवतात .

गदिमांच्या बाबतीत असं काही घडलं होतं का ? आपल्याला कदाचित ऐकून माहिती असेल कि गदिमांना रोजनिशी लिहायची सवय होती . त्यांच्या करीयरला सुरुवात झाल्यापासूनच्या म्हणजे अठ्ठेचाळिस सालापासून ते त्यांच्या अखेरच्या आजारापर्यंतच्या म्हणजे ७७ सालापर्यंतच्या रोजनिशी उपलब्ध आहेत . ५२ सालच्या रोजनिशितील मजकूर वाचण्यासारखा आहे .

आम्ही माडगूळकर मंडळी आता शहरात स्थिरावलो असलो तरी आम्ही मूळचे सांगली जिल्ह्यातल्या माडगूळ नावाच्या छोट्याश्या खेड्यातले . आजही तिथं आमचा मळा आहे. वडिलांच्या श्राद्धाच्या निमित्ताने दरवर्षी गदिमा गावाकडे जात तसेच त्या वर्षीही गेले होते . तिथे त्यांचा रोजचा कार्यक्रम साधारण असा असे . भल्या पहाटे उठून रपारपा चालत मळ्याकडे जायचं तिथल्या तुडुंब निव्वळशंख विहिरीत मनसोक्त डुंबायचं ! तोपर्यंत घराकडून झुणका भाकरी ठेचा अशी काहीतरी त्यांची आवडती न्याहारी येत असे . ते टापरून न्याहारी करत आणि तिथेच विहिरीच्या बांधावर वामकुक्षीसाठी आडवे होत . मग संध्याकाळच्या सुमाराला सावकाश घरी जात . त्यादिवशीही अशीच झकास न्याहारी करून ते विहिरीच्या काठावर पहुडले आणि त्यांचा गाढ डोळा लागला . जाग आली तेंव्हा मावळायला आलं होतं पश्चिम क्षितीज तांबडं लाल झालं होतं . त्या अलौकिकाच्या पार्श्वभूमीवर त्यांना एक आणखी अलौकिक दिसलं . सारं क्षितीज एका प्राचिन दिव्यानं व्यापलं गेलं होतं .त्यातून लक्षावधी किरण बाहेर पडत होते आणि ते जणू गदिमांमध्ये प्रवर्तीत होत होते हे दृश्य आणखी काही क्षण तसंच राहिलं आणि मग ह्ळूहळू अंतर्धान पावलं . त्या दिवशीच्या रोजनिशीत गदिमांनी हा सारा अनुभव तपशीलवार लिहिला आहे आणि मग म्हटलंय .. " हातून काहीतरी चांगलं लिहून होणार असं वाटतंय ! हा प्रसंग आहे ५२ सालाचा !

५४ सालात त्यांनी गीतरामायण लिहिलं नव्हे  त्यांच्याहातून ते लिहिलं गेलं पण ते सारं इतकं सरळ सोपं नव्हतं. कुण्या कवीनं म्हटलंय ना , जब जब राम ने जनम लिया तब पाया बनवास ! मग रामकथा तरी त्याला अपवाद कशी असेल ?

म्हणजे त्याचं असं झालं कि आपल्या अत्यंत बिझी कार्यक्रमातून वेळ काढून गदिमांनी गीतरामायणाचं पहिलं गीत लिहिलं आणि ते त्यांच्या जिवलग मित्रामार्फत .. नेमिनाथबरोबर बाबुजींकडे पाठवूनही दिलं .ध्वनिमुद्रणाच्या बाबुजी गीत शोधू लागले तर ते मिळतंय कुठं  ?  इकडे गदिमा मात्र आपलं काम आता संपलं आहे अशा थाटात पंचवटीवर निवांत झोपले होते . गीतरामायण प्रकल्पाचे सर्वेसर्वा होते सीताकांत लाड ! ते गदिमा आणि बाबूजी दोघांचेही जिवलग ! बाबूजींनी पिशवी आणि पँटचे खिसे उलटेपालटे केले तरी गीत सापडेना म्हटल्यावर लाडांचं धाबं दणाणलं ! त्यांनी पंचवटीवर गदिमांना बोलावण्याकरता माणूस पाठवला. गदिमा बिचारे " ही काय नविन भानगड म्हणून डोळे चोळतच आले . आणि त्यांना खरा प्रकार समजल्यावर भडकले .  लाड हुशार ! त्यांनी तो भांडाभांडीचा भर ओसरूं दिला  आणि मग निर्णायक आवाजात अण्णांना सांगितलं , उद्या सकाळी ब्रॉडकास्ट आहे तेंव्हा अण्णा ! हे गीत तर तुम्हाला लिहिलंच पाहिजे . मी आता तुम्हाला इथल्या एका खोलीत बंदकरून बाहेरून चक्क कडी घालणार आहे . काळजी न करणे . आत पान , तंबाखू . कागद , दौत लेखणी इत्यादी साधनसामग्रीची चोख व्यवस्था आहे . गीत लिहून झाले कि दारावर टकटक करणे . लाडांनी गदिमांना खरोखरीच आकाशवाणीतील एका खोलीत बंद केलं आणि असं म्हणतात कि दहापंधरा मिनिटाच्या अवधीतच गदिमांनी आतून टकटक केलं, लाडांनी दार उघडलं आणि गदिमांनी गीतरामायणातील पहिलंवहिलं गीत त्यांच्या हवाली केलं ,

स्वये श्री श्री रामप्रभू ऐकती, कुशलव रामायण गाती !

खरोखर असे चमत्कार गीतरामायण आकाराला येताना सतत घडत होते . म्हणूनच गदिमा आणि बाबूजी अत्यंत श्रद्धेने सांगतात कि गीतरामायण आम्ही केलेले नाही , ते आमच्या हातून झाले आहे .

   
  Print Printable Version
 
 
 
Anand Madgulkar Logo